Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Wednesday, 4 November 2020

देवळे : देवालयांचे गाव❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄

         *🔸देवळे : देवालयांचे गाव🔸**देवळे, हे देवालयांचे गाव म्हणून संगमेश्वर (जि. रत्नागिरी) तालुक्यात प्रसिद्ध आहे. त्या गावात खडगेश्वर, गावदेवी काळेश्वरी, विठ्ठल मंदिर, भैरी भवानी, रवळनाथ, श्रीकृष्ण, गणेश, मारुती पार, कालिका आणि दत्त मंदिर अशी प्रमुख नऊ तर लहानमोठी अनेक मंदिरे आहेत. त्यांपैकी गणेश मंदिर हे पेशवेकालीन आहे, तर खडगेश्वर मंदिराला अधिक जुना इतिहास आहे. कालिका मंदिराचे नाते थेट कोलकात्याच्या कालिका मंदिराशी आहे. ते मंदिर उघड्या स्थितीत आहे. बांधकाम करण्याचा प्रयत्न पूर्वी झाला होता पण ते बांधकाम लगेच पडले, असे जुने लोक सांगतात. त्यावरून त्या मंदिराचे बांधकाम टिकत नाही अशी आख्यायिका पसरली आहे.*


*देवळे गाव हे रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गाला लागून आहे. देवळे गावातजाण्यासाठी फाटा नाणीज गावापासून पुढे आठ किलोमीटरवर डावीकडे लागतो. तो रस्ता थेट खडगेश्वर देवालयासमोर येतो. तेथेच गावातील बाजारपेठ आहे. गावात वाड्या लहानमोठ्या सतरा आहेत. खडगेश्वर देवालयापासून सुरू होणारा दुसरा रस्ता वीस किलोमीटरवर असलेले तालुक्याचे ठिकाण, देवरुख येथे जातो. देवळे गाव हे रत्नागिरीपासून चाळीस किलोमीटर तर कोल्हापूरपासून सुमारे नव्वद किलोमीटर अंतरावर आहे. खडगेश्वर मंदिरात म्हणे एक गाय रोज येऊन पान्हा सोडायची. गायीच्या मालकाने त्या जागी खणण्यास सुरुवात केली आणि त्याची पहार एका दगडावर आपटली. त्यात त्या दगडाचा तुकडा पडला. ती पिंड शंकराची होती! खडगेश्वराच्या देवळातील पिंडीचा वरचा कोपरा उडालेला दिसतो, त्याची कहाणी अशी सांगितली जाते! त्या मंदिराचे बांधकाम चालुक्यकालीन आहे. गावातील आठल्ये परिवार हे त्या देवळाचे परंपरागत कारभारी आणि मानकरी आहेत. देवालयाचा शिवरात्र उत्सव तालुक्यात प्रसिद्ध आहे. तो उत्सव एकशेपंचवीस वर्षें 2020 साली पूर्ण करत आहे.*


*शिवरात्री उत्सवाप्रमाणे गावातील शिमगोत्सव तालुक्यात प्रसिद्ध आहे. गावाच्या पालखीबरोबर दाभोळे, मेघी, करंजारी आणि चाफवली ह्या गावांच्या पालख्या तेव्हा एकत्र आणल्या जातात आणि पाच गावांच्या पालख्यांच्या भेटीचा सोहळा पार पडतो.*


*गावातील कुंभार समाजाचा उत्सव प्रसिद्ध आहे. तो उत्सव शेतीचा हंगाम सुरू होण्याआधी मे महिन्यात पंधरा दिवस सुरू असतो. उत्सवात पूजा कुंभार समाजात परंपरेने करतात. त्यांचा खापरीचा नाच प्रसिद्ध आहे. त्या उत्सवात सतीची परंपरा आहे. जमिनीवर जाळ करून कुंभार समाजातील कोणी पुरुष स्त्री वेशात त्या जाळावरून उड्या घेतो. तो नाच पाहण्यासाठी आसपासच्या अनेक गावांतील लोक मोठ्या संख्येने जमा होतात. देवाचा आशीर्वाद मिळाला, की येणाऱ्या शेतीच्या हंगामात भरभराट होते, अशी श्रद्धा आहे.*


*रवळनाथ मंदिरालाही आख्यायिका आहे. त्या ठिकाणी आधी एक शेत होते. शेताचा मालक शेतात धान्य मोजत असताना धान्य मोजून संपेना. शेवटी कंटाळून, त्याने धान्य मोजण्याची पायली जमिनीवर आपटली. त्या जागी जमिनीतून रक्त येऊ लागले! शेतकऱ्याने त्या जागी खणून पाहिले असता तेथे पिंड मिळाली. रवळनाथ मंदिरात जी पिंड आहे तिच्या वरील भागाचे तीन तुकडे उडालेले दिसतात.*      


*त्या शिवायही, देवळे गावाला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. देवळे गावात जेथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्याच्या जवळ दगडी बांधकामाची खूप जुनी विहीर आहे. ती भोकरीची विहीर ह्या नावाने प्रसिद्ध आहे. विहिरीचा आकार लंबवर्तुळाकार म्हणजे पिंडीच्या आकाराचा आहे. विहिरीला पाणी उन्हाळ्यातही मुबलक असते. देवळे गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र महत्त्वाचे मानले जाते. ते रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटाच्या खाली असलेले पहिले आरोग्य केंद्र आहे. तेथून संगमेश्वर तालुका सुरू होतो. तेथून म्हणजे घाटीवळे, चोरवणे पासून ते मेढेपर्यंत दहा गावांतील रुग्णांना सेवा दिली जाते. त्या गावांतील आरोग्य उपकेंद्रे देवळे आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत येतात. देवळे हे गाव आंबा घाटाच्या पायथ्यापासून वीस किलोमीटर लांब असल्याने आणि घाटात होणाऱ्या अपघातांचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यानंतर घाटाच्या पायथ्याशी असलेल्या साखरपा गावात दुसरे आणि अद्ययावत केंद्र सुरू करण्यात आले आहे.*


*पेशवे घराणे हे गणेशभक्त. त्यांच्या काळात देवळे गावात गणेश मंदिर बांधण्यात आले. मंदिराला लागून पूल आहे. त्याचे बांधकामही पेशवेकालीन आहे असे बांधकाम तज्ज्ञांचे मत आहे. त्याशिवाय गावातील एका टेकडीवर वीरगळ आहेत.*


*शिवाजी महाराजांच्या काळात देवळे गावाला महत्त्व होते. त्या गावातून आसपासच्या सुमारे चाळीस गावांचा कारभार चाले. गावात जेथे हायस्कूल आहे तेथे बाजूला पूर्वी खलबतखाना होता. तेथे सरदारांच्या आणि कारभाऱ्यांच्या मसलती होत असत. खलबतखान्याच्या चौथऱ्याचे भग्न अवशेष दिसतात. देवळे गावात शिवाजी महाराज स्वत: येऊन गेल्याचा उल्लेख ग्रंथात आहे. देवळे गावाला लागून चाफवली नावाचे गाव आहे. तेथे स्वराज्यकाळात पाटोळे नामक सरदार राहत होते. त्यांच्याशी स्वराज्यातील काही सरदारांचे वाद होते. ते मिटवून पाटोळे यांनाही स्वराज्यात घेण्यासाठी स्वत: राजे रायगडावरून देवळे येथे येण्यासाठी निघाले. ते गावात पोचले, पण तेवढ्यात सेवक अत्यंत महत्त्वाचा निरोप घेऊन आल्यामुळे राजांना परत जावे लागले. तो उल्लेख गावातील काही घराण्यांच्या ऐतिहासिक पुस्तकात आहे.*


*गावाला लागून आणखी एक गाव म्हणजे मेघी. देवळे आणि मेघी ह्या गावाच्या हद्दीवर खिंड आहे. तिला घोडखिंड म्हणतात. संभाजी राजे संगमेश्वरातवास्तव्याला असताना, त्यांनी स्वत:चे घोडदळ उभारले. ते घोडदळ परिसरावर नजर ठेवण्यासाठी फिरत असताना त्या खिंडीत अनेक वेळा विश्रांतीसाठी थांबत असे. म्हणून त्या खिंडीला घोडखिंड असे नाव पडले.*      


*देवळे गावातील ग्रामस्थ शशी शेखर आठल्ये हे स्वातंत्र्यसैनिक होते. ते जनसंघाचे आमदार म्हणून निवडून गेले होते. त्यांनी देवळे-मुंबई ही एसटी सेवा सुरू केली. ती सेवा पंचवीस वर्षें सुरू होती. कोकण रेल्वेच्या प्रभावाने कोकणातून मुंबईला जाणाऱ्याकाही गाड्यांचे भारमान कमी झाले आणि त्या बंद पडल्या, त्यात देवळे-मुंबई ही एसटीही बंद पडली. आठल्ये यांच्या प्रयत्नातून गावात पहिली बँक 1984-85 साली सुरू झाली. ‘रत्नागिरी-सिंधुदुर्ग ग्रामीण बँक’ या नावाने सुरू झालेल्या त्या बँकेचे नंतर ‘वैनगंगा-कृष्णा सहकारी बँक’ असे नामांतर झाले. सध्या ती बँक ‘विदर्भ कोकण बँक’ या नावाने सुरू असून त्या बँकेचा विस्तार संपूर्ण राज्यात झाला आहे.*


*गावात ‘देवळे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळा’च्या अधिपत्याखाली ‘एस एन कानडे आयडियल हायस्कूल’ची सुरुवात 1965 साली झाली. त्या हायस्कूलमध्ये मराठी माध्यमाबरोबर सेमी इंग्रजी माध्यमही सुरू आहे. हायस्कूलमध्ये शिकलेले बाजूच्या मेघी गावातील डॉ.चंद्रकांत वाजे सध्या रायगड जिल्ह्यात प्रथितयश डॉक्टर म्हणून सेवा देत आहेत. चाफवली गावातील, पण त्या हायस्कूलमध्ये शिकलेले विलास चाळके यांनी राजकीय जीवनात पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आणि जिल्हा परिषद शिक्षण सभापती अशी वाटचाल केली आहे. सुरेश जाधव यांच्या प्रयत्नातून गावात विविध कार्यकारी बिगर शेतीसोसायटी सुरू करण्यात आली. रविंद्र आठल्ये यांच्या पुढाकारातून ‘वि.स. खांडेकर वाचनालय’ दशकभरापासून सुरू आहे.*         

❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄ 

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot